Karnataka Elections 2023:आधी खर्गेंची पीएम मोदींवर टीका; आता भाजप नेत्याचे सोनिया गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:48 PM2023-04-28T15:48:19+5:302023-04-28T16:07:06+5:30
Karnataka Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी नेत्यांची भाषेची पातळी घसरत चालली आहे.
Karnataka Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका (Karnataka Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी नेत्यांची भाषेची पातळी घसरत चालली आहे. मते मिळविण्यासाठी नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते आणि आता भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बसनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
खालच्या पातळवरील टीका
भाजपचे नेते बसनगौडा पाटील (Basangouda Patil) यांनी तर सोनिया गांधींना 'विष कन्या' आणि 'पाकिस्तानी एजंट' म्हटले आहे. याआधी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे कर्नाटकातील हावेरी येथे काँग्रेसचा प्रचार करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते.
एकमेकांविरोधात तक्रारी
कर्नाटकातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये एकमेकांविरोधात तक्रारी करण्याची स्पर्धा लागली आहे. मोदी हे विषारी सापासारखे आहेत, या विधानाविरोधात भाजपने यापूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आता भाजप नेत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसने एफआयआर नोंदवणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले बसनगौडा पाटील?
कोप्पल येथील जाहीर सभेत पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारले आहे. अमेरिकेने एकेकाळी त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता, पण नंतर रेड कार्पेट पसरवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. खर्गे यांच्या 'विषारी साप' या विधानावर पलटवार करत आमदार म्हणाले की, आता ते (खर्गे) त्यांची (पीएम मोदी) तुलना सापाशी करत आहेत. तुम्ही (खर्गे) ज्या पक्षात नाचता, त्या पक्षात सोनिया गांधी विषकन्या आहेत का? सोनियांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केले, असेही ते म्हणाले.