नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यावर दिल्लीतील जंतर-मंतरवर रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम विरोधी घोषणा देण्याचा आरोप आहे. उपाध्याय यांच्यासह विनोद शर्मा, दीपक सिंह, दीपक, विनीत क्रांती आणि प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात भा.दं.वि.कलम 153अ आणि 188 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अश्विनी उपाध्याय यांच्यासह सर्व आरोपींची मंगळवारी सकाळपर्यंत चौकशी केली. पोलिसांनी उपाध्याय यांना सोमवारी रात्रीच कनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये येण्यासाठी समन बजावला होता. इतर काही संशयितांना पकडण्यासाठी शहरात विविध ठिकाणी छापेमारी सुर आहे. दरम्यान, भडकाऊ भाषणांसाठी लोकप्रिय पंडित नरसिंहानंद सरस्वती आणि टीव्ही अभिनेते आणि भाजपा नेते गजेंद्र चौहानदेखील या विरोध प्रदर्शनात उपस्थित होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरलदरम्यान, सोमवारी या विरोध प्रदर्शनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये जंतर-मंतरवरील प्रदर्शनात 'राम-राम' आणि 'हिन्दुस्तान में रहना होगा, जय श्री राम कहना होगा'च्या घोषणा दिल्या जात आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. दरम्यान, पोलिसांनी सांगितल्यानुसार, कोरोनामुळे या विरोध प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली नव्हती. परवानगीशिवाय गर्दी जमवून हे प्रदर्शन करण्यात आले होते.