हरियाणाचे भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनाचे अध्यक्ष सुरज पाल अमू यांनी गुडगावच्या पतौडीमध्ये आयोजित महापंचायतीत वादग्रस्त विधान केलं आहे. ''तुम्ही इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा आणि इतिहास घडवायचा असेल तर तैमूर, औरंगजेब, बाबर आणि हुमायूं जन्म घेता कामा नयेत", असं विधान सुरज पाल अमू यांनी केलं आहे. (BJP spokesperson at mahapanchayat: ‘If you want to make history, Taimur Aurangzeb, Babur won’t be born’)
"भारत जर आपली माता आहे, तर पाकिस्तानचे आपण बाप आहोत आणि पाकिस्तानी लोकांना इथं भाड्यानं घरं देऊ नका. यांना देशातून हाकलून लावा. तसा प्रस्ताव संमत व्हायला हवा", असं सुरज पाल अमू म्हणाले.
धर्मपरिवर्तन, लव्ह जिहाद आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा या विषयांवर चर्चा करण्यासाठी महापंचायतचं आयोजन करण्यात आलं होतं. "देशात १९४७ साली जेव्हा विभाजन झालं तेव्हा १० लाख लोकांचे मृत्यू आम्ही पाहिले आहेत. त्या लढ्यात प्राण गमावलेल्यांचा हिशोब आजपर्यंत लागू शकलेला नाही आणि आज आपण त्यांना राहण्यासाठी घर, दुकानं देत आहोत. पतौडीसारख्या भागांमध्ये आता त्यांचे महोल्ले तयार झाले आहेत", असंही सुरज पाल अमू म्हणाले.
सुरज पाल यांच्या विधानाबद्दल भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता हे त्यांचं वैयक्तिक मत असून पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सुरज पाल अमू यांना हरियाणा भाजपा प्रवक्तेपदी २०१३ साली नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात ते भाजपाचे मुख्य माध्यम समन्वयक म्हणूनही काम पाहात होते. ११ जून २०२१ रोजी त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलं आहे.