लखनऊ - शहाजहानपूर बलात्कार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकारावर भाजपाने भाष्य केलं आहे. भाजपा प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी दावा केला आहे की, चिन्मयानंद हे भाजपाचे सदस्य नाहीत. चिन्मयानंदांनी त्यांचे सदस्यत्व नुतनीकरण केले नव्हते. त्यांच्या मोबाईलवरुन मिस कॉल आलेल्याचा डेटाही आमच्याकडे उपलब्ध नाही असं सांगत या प्रकरणापासून हात वर केलेले आहेत.
भाजपा प्रवक्ते राकेश त्रिपाठी आणि हरीश श्रीवास्तव यांनी सांगितले की, स्वामी चिन्मयानंद यांच्याशी भाजपाचा संबंध नाही. चिन्मयानंद भाजपाचे खासदार होते. मात्र पक्षात सक्रीय राहण्यासाठी एक कार्यप्रणाली असते. ज्यामध्ये दर तीन वर्षांनी कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणी करावी लागते. सक्रीय सदस्य बनण्यासाठी 250 ते 300 सदस्य त्यांना बनवावे लागतात असं त्यांनी सांगितले.
तसेच पक्षाची ही कार्यपद्धती असल्याने जो कोणी याचं पालन करत नाही ते सदस्य राहत नाही. त्यामुळे स्वामी चिन्मयानंद भारतीय जनता पक्षाचे विद्यमान सदस्य नाही. त्यामुळे जर ते पक्षात असतील तर त्यांना काढलं जातं जर ते सदस्यच नाहीत तर पक्षातून कसं काढणार असा प्रतिप्रश्न भाजपा प्रवक्त्यांनी पत्रकारांना केला.
दरम्यान चिन्मयानंद प्रकरणाशी भाजपाचा काही संबंध नाही सांगताना प्रवक्त्यांनी सांगितले की, पक्षाचे सदस्य बनण्यासाठी मिस्ड कॉल द्यावा लागतो. मिस्ड कॉल दिल्यानंतर संबंधित व्यक्तीचा डेटा पक्षाच्या रेकॉर्डवर येतो. चिन्मयानंदांनी ही औपचारिकता पूर्ण केली नाही. नवीन सदस्य नोंदणीमध्ये त्यांचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा आणि भाजपाचा संबंध नाही असा खुलासा प्रवक्त्यांनी केला आहे.
विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या छळाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.