नवी दिल्ली - कोरोनामुळे जगातील अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची गुरुवारी (23 एप्रिल) एक बैठक झाली असून यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
सोनिया गांधी यांनी कोरोनाशी लढत असताना भाजपाकडून जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत चिंता करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 'मला तुमच्यासोबत असं काही शेअर करायचं आहे ज्याची प्रत्येक भारतीयाने चिंता करण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाशी लढा देणं अपेक्षित असताना भाजपा मात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेष पसरवत आहे' असं त्यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनमध्ये 12 कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित 7500 रूपये देण्याची मागणी केली. तसेच कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय अनेक वैद्यकीय कर्मचारी कोरोनाचा सामना करत आहेत. त्यामुळे या सर्व कोरोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे असं देखील सोनिया गांधी यांनी बैठकीत म्हटलं आहे.
'लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 12 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला आहेत. येणाऱ्या काही दिवसांत बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान 7500 रूपयांची आर्थिक मदत देणे आवश्यक आहे' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत सवाल उपस्थित केला आहे. पीपीई किट्सची गुणवत्ता योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत. खरीपाच्या पिकांसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत. प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम शेतकरी खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण
Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू