संजय शर्मा नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले सर्व स्टार प्रचारक उतरवले आहेत. भाजपचे सर्वांत मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिलला कर्नाटकातील बेळगाव येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आधीच कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवार आणि बुधवारी भाजप कर्नाटकात सर्व २२४ मतदारसंघांत स्टार प्रचारकांना प्रचारात उतरविणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ पासून राज्यात दौरा सुरू करणार आहेत. बेळगावमधील चिक्कोडी, कित्तूर, कुडाची या भागाचा ते दौरा करतील. त्यानंतर पंतप्रधान ३, ५ आणि ८ मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून २५ एप्रिलला अमित शाह बागलकोट जिल्ह्यातील तेरादल, विजयपुरा जिल्ह्यातील देवरीपरागी आणि यादगिरी येथे निवडणूक सभा घेणार आहेत. यादगिरीमध्ये ते रोड शो करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील कर्नाटकातच प्रचारात व्यस्त आहेत.
राजनाथ सिंह, गडकरी, फडणवीस यांच्याही सभा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २६ एप्रिल, २९ एप्रिल, ५ मे आणि ७ मे रोजी कर्नाटकात प्रचारासाठी जाणार आहेत. या चार दिवसांत राजनाथ सिंह २० निवडणूक सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही कर्नाटकात पोहोचल्या आहेत. २५ एप्रिल ते ८ मे दरम्यान स्मृती इराणी डझनभर निवडणूक
सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील २६ पासून कर्नाटकात आपला निवडणूक प्रचार सुरू करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.
अमित शाह यांच्याकडून चामुंडेश्वरीची पूजाम्हैसूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथील चामुंडी हिल्सवरील प्रसिद्ध प्राचीन मंदिराला भेट देऊन देवी चामुंडेश्वरीची पूजा केली. त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली.