नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी भावी काळातील बदलांसाठी सज्ज राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरणाऱ्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येईल, असा इशाराही मोदी यांनी दिला. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मोदींनी सांगितले की, बदल ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी त्याला सामोरे जाण्यास तयार राहिले पाहिजे. पंतप्रधान, गृहमंत्री शाह यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानंतर जुलैत मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशा चर्चेने जोर धरला आहे.
प्रसारमाध्यमे प्रवक्तेपदीही निवडीभाजप काही नेत्यांची प्रसारमाध्यमे प्रवक्ता म्हणून निवड करणार आहे. त्यामध्ये गौरव भाटिया (मध्य प्रदेशसाठी), के. के. शर्मा (छत्तीसगढ), राजस्थान (राज्यवर्धनसिंह राठोड), जीव्हीएल नरसिंहा (तेलंगणा) यांचा समावेश असणार आहे.
कोणत्या राज्यात प्रदेशाध्यक्ष बदल? पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच भाजपमध्येही संघटनात्मक बदल करण्याबाबत आग्रही आहेत. त्याची सुरुवात पाच राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापासून होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी पंजाबमध्ये भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येईल. अश्विनी शर्मा यांनी राजीनामा दिल्याने त्या पदावर सुनील जाखड यांची निवड होईल, अशी चर्चा आहे. तेलंगणा, झारखंड, केरळमध्येही भाजप नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्याच्या विचारात आहे.
निवडणूक प्रभारींची निवडही लवकरच होणारयेत्या नोव्हेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथे भाजप केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे.