नवी दिल्ली: यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. यातच भारत जोडो यात्रेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला चोर आणि डाकू म्हणत सरकार चोरीचा आरोप केला.
भाजपने आमची सरकारे चोरलीकाँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरुवारी पठाणकोटला पोहोचली. यावेळी खर्गे म्हणाले की, "भाजप सरकारने आमच्या पक्षातील अनेक लोकांना धमकावून पळवून नेले. त्यांनी देशभरातील आमची 6 सरकारे पाडून स्वतःची सरकारे स्थापन केली. आता आम्ही भाजपला चोर...डाकू म्हणावं की काय म्हणावं? लोकांनी काँग्रेस पक्ष निवडला, आम्हाला आशीर्वाद दिला, पण त्यांनी आमची सरकारे चोरली,'' असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
सभागृहात गोंधळ घालतातखर्गे पुढे म्हणतात की, ''जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संसदेत उभे राहतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सभागृहावर प्रभाव टाकतात. जेव्हा आम्ही ऐकायला तयार असतो तेव्हा ते बोलत नाहीत. आम्ही बोलायला उभे राहतो, तेव्हा ते ऐकायला तयार नसतात. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ती 6 सरकारे चोरली. काहींना पैसे दिले, काहींना लालूच दाखवली, काहींना ईडी-इन्कम टॅक्सची भीती दाखवली,'' असंही खर्गे म्हणाले.
भाजपवाले समाजाला तोडत आहेतते पुढे म्हणाले की, ''राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुरू झालेली यात्रा देशातील जनतेला जोडणारी आहे. आज भाजप सरकार, आरएसएसचे लोक समाजाला तोडत आहेत. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या उणिवा लोकांना सांगण्यासाठीच राहुल गांधी आले आहेत. विशेषतः महागाई, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती याबाबत लोकांना माहिती देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत,'' असेही खर्गे म्हणाले.