BJP Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने ६७ उमेदवारांची घोषणा केली. भाजपने अनेक विद्यमान आमदार, मंत्र्यांना डच्चू दिला असून, बाहेरून आलेल्यांना संधी दिली आहे. त्यानंतर भाजपमध्ये राजीनाम्यांची लाट आली आहे. मंत्री, आजी-माजी आमदारांसह निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या नेत्यांनी भाजपला राम राम केला आहे.
पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. एकापाठोपाठ एक राजीनामे पडत असून, यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी राजीनामे दिल्याने हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.
तिकीट कापताच भाजपला रामराम; कुणी-कुणी दिला राजीनामा?
हरियाणातील भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कंबोज यांचे इंद्री विधानसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, असे त्यांनी सांगितले.
दादरी किसान मोर्चाचे अध्यक्ष विकास ऊर्फ भल्ले यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर रतियाचे आमदार लक्ष्मण नापा यांनीही तिकीट न मिळाल्याने राजीनामा देत भाजपला रामराम केला आहे.
सोनीपतचे भाजपचे युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनीही राजीनामा दिला आहे. जेजेपी पक्षातून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री अनुप धानक यांना उकलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शमशेर गिल यांनी भाजप प्रदेशाध्यांना आपला राजीनामा दिला.
हरियाणा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर मांडी यांनीही राजीनामा दिला आहे. हिसारमधील दर्शन गिरी महाराज, सीमा गैबीपुरी यांनीही पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनींचा मतदारसंघही बदलला
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा मतदारसंघही बदलण्यात आला आहे. सैनी यांना लाडवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत ते कर्नाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.