कोलकाताः 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे प्रकार समोर आले होते. अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आता उत्तर 24 परगाणा जिल्ह्यातील बदुरिया भागात अज्ञात लोकांनी भाजपा कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना बाजितपूर-कालिटोला भागात घडली आहे. मृताची ओळख 35 वर्षीय अजय मंडलच्या रूपात झाली आहे. जो मासे विक्रेता आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा खून करण्यात आला आहे. तो मासे खरेदी करण्यासाठी एका मासे पालन केंद्रात जात असतानाच त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. अजयला कालिटोला भागात दोन बाइकस्वारांनी थांबवलं. त्यानंतर त्याच्यावर त्या लोकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या नराधमांनी अजयच्या चेहऱ्यावर वार करून तो पूर्णतः विद्रूप केला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्याच्या घरातील मंडळी आणि तो लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारात सक्रिय असल्यानंच त्याची हत्या करण्यात आल्याची आता चर्चा आहे.त्याची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. बदुरियाच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, भाजपा समर्थकाशिवाय मृताची त्या भागात एवढी ओळख नाही. त्यामुळे त्याची हत्या करण्याचं कारण राजकीय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बंगालमध्ये बाईकस्वारांनी धारदार शस्त्रानं भाजपा कार्यकर्त्याची केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 9:55 AM