नवी दिल्ली : फेसबुकवरनिवडणूक जाहिरातींमध्ये भाजपा आणि समर्थक सर्वात पुढे आहेत. फेसबुकच्या एका अहवालामध्येच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यानुसार फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान एकूण 16,556 जाहिराती देण्यात आल्या. यासवर 4.13 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. यापैकी 50 टक्क्यांहून जादाचा खर्च केवळ भाजपा आणि समर्थकांनी केल्याचे म्हटले आहे. तर व्यक्तीगत स्वरुपात सर्वाधिक खर्च करण्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा नंबर आहे.
निवडणूक काळात फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात. यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीनंतर फेसबुकने कठोर नियम केले असून नुकतेच काँग्रेस, भाजपाची पेजेस कायमची बंद केली आहेत. मात्र, जाहिराती करण्यास फेसबुकने मनाई केलेली नाही.
भाजपाचे समर्थक फेसबूक पेज "भारत के मन की बात"ने निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर सर्वाधिक पैसे मोजले आहेत. त्यांनी 1.01 कोटी रुपये खर्च केले आहेत. या पेजवरून एका महिन्यात 1168 जाहिराती देण्यात आल्या. या पेजवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, त्यांना मोदी सरकारचे काम दाखविण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर "नेशन विद नमो" हे मोदी समर्थकांचे दुसरे पेज असून त्यांनी महिनाभरात 631 जाहिराती दाखविल्या. यासाठी त्यांनी 52.24 लाख रुपये खर्च केले. तर क्षेत्रिय पक्षांनी फेसबुकवर जाहिरातींसाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि समर्थकांनी केवळ 10 लाख रुपये खर्च केले आहेत.
नवीन पटनायक आघाडीवर फेसबुकवर व्यक्तीगत जाहिराती देण्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आघाडीवर आहेत. त्यांनी 4.48 लाख रुपये खर्च केले आहेत. तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी 2.08 लाख रुपये खर्च करत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे आमदार नरेंद्र खीचर, चौथ्या क्रमांकावर भाजपाचेच मुरलीधर राव आणि पाचव्या नंबरवर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी आहेत.