Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चे सर्वत्र वारे वाहत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला असताना राजकीय पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. उमेदवार आपल्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत असतात. अशातच एका लग्न पत्रिकेचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एका लग्नपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला असून यावर ४०० पारचा नारा देखील लिहिण्यात आला आहे. २०१९ मध्ये देखील अशी पत्रिका पाहायला मिळाली होती, ज्यावर 'देश भक्त चौकीदार', असा आशय लिहिण्यात आला होता.
संबंधित नवरदेवाच्या वडिलांच्या सांगण्यावरून मुलाची लग्नपत्रिका अशा शैलीत छापण्यात आल्याचे कळते. खरं तर या आधी देखील अशा प्रकारच्या लग्नपत्रिका समोर आल्या आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक या माध्यमातून प्रचार करून सर्वांचे लक्ष वेधत असतात. २०१८ मध्ये देखील अशा प्रकारची एक लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांचे फोटो पत्रिकांवर झळकले होते. हा ट्रेन्ड २०२४ च्या निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहे.
लग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो दरम्यान, लग्न पत्रिकेत प्रामुख्याने गणपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली श्रद्धा असलेल्या देव-देवतांचे फोटो लोक छापत असतात. पण, अनेकांनी लग्नपत्रिकेद्वारे राफेल विमानाचा सौदा आणि स्वच्छ भारत मिशनलाही पाठिंबा दिला होता. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळते की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत एका जोडप्याने त्यांच्या लग्नपत्रिकेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वातील सरकारच्या योजनांची यादी छापली होती. यासोबतच एक भेट म्हणून मोदींना पुन्हा एकदा निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. २०२३ मध्ये तेलंगणा येथील तरूणाने लग्नपत्रिकेत मोदी आणि स्थानिक खासदार संजय कुमार यांचा फोटो छापला होता. तर एकाने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून राफेल विमानाचे महत्त्व सांगितले होते.