रायपूर : बहुजन समाज पार्टी आणि अजित जोगी यांच्या पक्षांदरम्यानच्या निवडणूकपूर्व युतीला सत्तारूढ भाजपचा पाठिंबा असल्याचा दावा करीत काँग्रेसने या युतीवरून बसपावर शरसंधान साधले.सीबीआय आणि ईडीच्या दडपणामुळे बसपाने अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगढ (जेसीसी) या पक्षासोबत युती केली. भाजपच्या पाठिंब्याने ही युती करण्यात आली असून, जनताही हे पक्के जाणून आहे. मागेही बसपाने भाजपच्या इच्छेनुसार उमेदवार उभे केले होते. आगामी निवडणुकीतही बसपा सत्तारूढ भाजपच्या मर्जीनुसार उमेदवार उभे करील. भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करणाऱ्या जोगी यांच्यासोबत हातमिळवणी केल्याने बसपाचा खरा चेहरा उघड झाला आहे, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भूपेश बघेल यांनी म्हटले आहे. बसपा छत्तीसगढमध्ये ३५, तर जेसीसी ५५ जागा लढविणार आहे. या युतीपासून आम्हाला धोका वाटत नाही. उलट आम्हाला फायदा होईल, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपच्या पाठिंब्याने बसपा, जेसीसी युती; काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 5:22 AM