बलिया: अॅलोपॅथी आणि आयुर्वेद उपचार पद्धतीवरून गेल्या काही दिवसांपासून देशात वादविवाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीविरोधात वक्तव्य केले होते. यावरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले असून, आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता उत्तर प्रदेशमधील बलिया येथून भाजप आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या भूमिकेला पाठिंबा देत अॅलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करत असल्याचा आरोप केला आहे. (bjp surendra singh support to baba ramdev on allopathy dispute)
अलीकडेच बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीला स्टुपिड सायन्स म्हणून हिणवले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि नवा वाद सुरू झाला. आएमएने बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा नोंद करत अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. मात्र, यानंतर भाजपचे बलिया येथील आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, बाबा रामदेव यांना पाठिंबा दर्शवला आहे.
अॅलोपॅथी क्षेत्रातील लोकं पांढऱ्या वेशातील गुन्हेगार
सुरेंद्र सिंह आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, महागड्या उपचार पद्धतीचे समर्थन करत समाजाला लुबाडणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत. १० रुपयांचे औषध १०० रुपयांना विकणारी लोकं पांढऱ्या वेशातील गुन्हेगार असून, अशी माणसे समाजाचे हितकारक कधीच असू शकत नाहीत, असा आरोप सिंह यांनी केला आहे.
Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!
पूर्वीच्या युगातील राक्षस परवडले
अॅलोपॅथी क्षेत्रातील डॉटर्स राक्षसांसारखे काम करत आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीलाही आयसीयूमध्ये ठेवून पैसे कमवण्याचे काम डॉक्टर्स करतात. यापूर्वीच्या युगातील राक्षस एखाद्याला मारून सोडून देत होते. मात्र, आजच्या युगातील डॉक्टर्स मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे लुटण्याचे काम करतात, असा गंभीर आरोप सिंह यांनी लावला आहे.
आयुर्वेदिक उपचार पद्धती पारंपरिक
बाबा रामदेव यांची आयुर्वेदिक उपचार पद्धती आपल्याकडील सनातन परंपरा आहे. आयुर्वेदाचा स्वीकार करून स्वस्थ भारत-समर्थ भारत यासाठी मोठे काम केले जाऊ शकते. मी सन्यास स्वीकारणार नाही. मात्र, राजकीय सन्यासानंतर याच अभियानात सहभागी होणार आहे. यासाठीच बाबा रामदेव यांना माझे समर्थन असून, अॅलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टरांचा निषेध करतो, असेही सिंह यांनी म्हटले आहे.