नवी दिल्ली : उत्तराखंडचे खानपूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत बंदुका घेऊन डान्स करताना दिसून आले. त्यांच्या या कृत्यामुळे भाजपाने त्याच्यावर हकालपट्टीची शुक्रवारी कारवाई केली.
प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कोणत्या मारहाणीचा नव्हता, तर प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करतानाचा होता.
प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या काही समर्थकांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी 'लांबा लांबा घूंघट काहे को डाला ...' या गाण्यावर प्रणव सिंह चॅम्पियन एका हातात दारुचे ग्लास आणि एका हातात 4-4 बंदुका घेऊन डान्स करत आहे. त्यांच्या या पार्टीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाण टीका करण्यात येत होती.
दरम्यान, प्रणव सिंह चॅम्पियन यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना प्रणव सिंह चॅम्पियन दिसून आले होते. याप्रकरणी पत्रकाराकडून दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात प्रणव सिंह चॅम्पियन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर जूनमध्ये तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती.