नवी दिल्ली - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चारही जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांच्या निवडणुकीत तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांचा विजय झाला. तर भाजपाचे घनश्याम तिवारी यांचा विजय झाला. भाजपाने समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यानंतर भाजपने पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केलेल्या आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजपाच्या एका महिला आमदाराने काँग्रेसच्या उमेदवाला मतदान दिलं. त्यामुळे भाजपाने संबंधित महिला आमदाराला थेट घरचा रस्ता दाखवत निलंबित केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या महिला आमदार शोभारानी कुशवाह यांनी राज्यसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात मतदान करताना काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपाने आमदार शोभारानी यांना निलंबित केलं आहे.
भाजपाने शोभारानी यांना पाठवलेल्या पत्रात "राज्यसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाने 9 जूनला व्हिप जारी करत आपल्या पक्षाच्या आमदारांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. पण मतदान करताना शोभारानी यांनी पक्षाते अधिकृत एजंट यांना मतपत्रिका दाखवली तेव्हा त्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला मत न देता काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान करण्यात आलं. हे पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन आहे" असं म्हटलं आहे.
"शोभारानी यांना भाजपाच्या थेट प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात येत आहे. शोभारानी यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात येत आहे. या दरम्यान आपण पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन का केलं आणि आपल्याला पक्षातून का निलंबित करू नये याबाबत स्पष्टीकरण द्यावं. सात दिवसात त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही तर शोभारानी यांना या विषयात काहीच सांगायचं नाही असं मानलं जाईल आणि पक्ष याबाबत पुढील पाऊल उचलण्याबाबत स्वतंत्र राहील" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,