लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, हळूहळू प्रचाराला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच भाजप नेत्यांची एक मोठी बैठक आयोजित केली होती. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे की, दलित बांधवांकडे अधिकाधिक जावे. त्यांच्यासोबत चहा घ्यावा, जेवण करावे, संपर्क वाढवावा आणि मगच मते मागावीत.
प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींकडून दलित बांधवांसोबत संपर्क वाढवण्यास सांगितले गेले आहे. ओबीसी आणि उच्चवर्णीय समाजातील पक्ष कार्यकर्त्यांशी स्वतंत्र देव सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी विशेष सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मते मागा
ओबीसी सामाजिक प्रतिनिधी संमेलनात बोलताना स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या तसेच शेजारच्या गावातील १० ते १०० दलित कुटुंबीयांशी, बांधवांशी, समाजाशी संपर्क वाढवावा. त्यांच्यासोबत चहा-पाणी करावे. जेवण करावे. तसेच दलित समाजातील बांधवांना हे पटवून द्यावे की, जात, क्षेत्र आणि पैशांसाठी नाही, तर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मते द्यावीत, असे स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. ती कायम ठेवण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर सर्व्हेक्षण केले आहे. एबीपी-सी व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी पाहता भाजपच्या जागा १०० ने कमी होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. त्यापैकी २१३ ते २२१ जागा भाजप जिंकू शकेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३२५ जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या १०० जागा कमी होत असताना समाजवादी पक्षाच्या १०० जागा वाढतील असा अंदाज आहे. २०१७ मध्ये ४८ जागा जिंकणारा समाजवादी पक्ष यंदा १५२ ते १६० जागा जिंकेल असा अंदाज आहे.