UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 08:28 AM2018-05-28T08:28:36+5:302018-05-28T08:42:35+5:30
सर्व विरोधक एकत्र आल्यानं भाजपासमोर कडवं आव्हान
लखनऊ: कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक एकत्र आले होते. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू असल्याचा संदेश यातून देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर, विरोधक एकत्र आल्यास भाजपाचं काय होणार, याची लिटमस टेस्ट आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघात होईल. कैराना मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाविरोधात बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.
आज देशभरात लोकसभेच्या चार, तर विधानसभेच्या 10 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी कैरानामध्ये भाजपच्या म्रिगांका सिंह यांच्यासमोर राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांचं आव्हान असेल. तबस्सुम यांना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध इतर सर्व, अशी लढत याठिकाणी पाहायला मिळतेय. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उपस्थित होते. विरोधकांनी दाखवलेली ही एकी भाजपासाठी किती अडचणीची ठरते, हे कैरानामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कैरानामधील पोटनिवडणूक महत्त्वाची आहे.
कैरानातील पोटनिवडणूक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांमध्ये मार्च महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला होता. त्यामुळे आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. भाजपाचे नेते हुकुम सिंह यांच्या निधनामुळे कैरानात पोटनिवडणूक होतेय. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.