"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 04:05 PM2023-08-11T16:05:59+5:302023-08-11T16:09:38+5:30

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता.

bjp targets congress rahul gandhi through song on shop of love | "मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

googlenewsNext

नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भाजपने 'मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं' अशा ओळींचा उल्लेख करत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेसच्या परिवारवादाचे धोरण, त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि देशाच्या फाळणीसारख्या अनेक कामांची खिल्ली उडवत भाजपने हा व्हिडिओ जारी केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने जारी केलेल्या या व्हिडिओकडे पाहिले जात आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणाचा काही भागही जोडण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींचे भाषण दाखवण्यात आले असून त्यात ते काँग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले, "हे लुटण्याचे दुकान आहे, यामध्ये द्वेष आहे, घोटाळे आहेत आणि मन काळे आहे". दरम्यान, सध्याचे सरकार देशात केवळ द्वेष पसरवत आहे, असा हल्ला राहुल गांधी पंतप्रधानांवर करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने हा व्हिडिओ जारी केला आहे.

व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना भाजपने लिहिले की, ''मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं. ये तो कमाई जाती है, कहीं बिकती नहीं. ये तो दिल में रहती है, दुकान में नहीं." याशिवाय, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना सुद्धा सांगितल्या. कलम 370 हटवणे, प्रत्येक घरात सिलिंडर पोहोचवणे, आत्मनिर्भर भारत आणि चांद्रयान मिशन यासारख्या योजना या व्हिडिओद्वारे दाखविण्यात आल्या आहेत.

विरोधकांच्या आघाडीवर मोदींचा हल्लाबोल
दरम्यान, गुरुवारी संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी आघाडी 'इंडिया'वर हल्लाबोल केला. इंडिया ही आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. या आघाडीमध्ये प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राहुल गांधींच्यावर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "त्यांचे मोदींवर इतके प्रेम आहे की, झोपेतही मोदी स्वप्नात येतात". दरम्यान, केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत आणलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.

Web Title: bjp targets congress rahul gandhi through song on shop of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.