नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमाच्या माध्यमातू मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, देशभरात 2,150 ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यापैकी 200 कार्यक्रम धार्मिक स्थळांवर होणार आहेत. देशभरातील मदरसे, दर्गे, चर्च आणि गुरुद्वारांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जातील. मौलवी, मौलाना आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही या कार्यक्रमांमध्ये सामील केले जाईल.
याचबरोबर, जमाल सिद्दीकी म्हणाले, आम्ही या कार्यक्रमाचा रिपोर्ट भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी सातत्याने शेअर करत आहोत. पक्षाध्यक्षांशी सातत्याने सविस्तर चर्चा सुरू आहे. मुस्लिम समाजाला कार्यक्रमाशी जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, भाजप देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'मन की बात'चा 100 वा कार्यक्रम आयोजित करणार आहे. तो खास बनवण्यासाठी भाजपने आराखडा तयार केला आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात यासंबंधी जबाबदारी सोपविली आहे. खासदारांना त्यांच्या संसदीय मतदारसंघात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले, "पक्ष प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंडल ते बूथ स्तरापर्यंत 'मन की बात' कार्यक्रमाचा 100 वा भाग आयोजित करण्याची तयारी करत आहे." राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते त्या दिवशीच्या 'मन की बात' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या विशेष कार्यक्रमाच्या स्मरणार्थ केंद्र सरकार 100 रुपयांची नाणी जारी करणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीनुसार, "मन की बातच्या 100 व्या भागाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून 100 रुपयांचे नाणे जारी केले जाईल." या कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या निमित्ताने करण्यात आली होती. रेडिओद्वारे जनतेसोबत पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे 99 भाग पूर्ण झाले आहेत.