लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी भाजपानेउत्तर प्रदेशमधील ५१ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. तर २४ जागांवर भाजपाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. उर्वरित ५ जागा ह्या मित्रपक्षांना मिळणार आहे. त्यामध्ये २ आरएलडी, २ आपना दल आणि १ एसबीएसपीला देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाकडून उर्वरित २४ जागांवर उमेदवार देताना अनेक धक्कादायक नावं समोर आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नूपूर शर्मा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. नूपूर शर्मा यांना भाजपा रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असा दावा केला जात आहे.
उत्तर प्रदेशमधील राजकारणाबाबत समोर येत असलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या यादीत काही आश्चर्यकारक नावांचा समावेश केला जाऊ शकतो. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीही पक्षाकडून नावांची घोषणा होऊ शकते. सोमवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्यात उत्तर प्रदेशमधील उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली होती. दरम्यान, रायबरेली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तसेच नूपूर शर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. रायबरेली हा काँग्रेस पक्ष २००४ पासून अजेय असलेला एकमेव मतदारसंघ आहे. येथून सोनिया गांधी ह्या सातत्याने निवडून येत आहेत. मात्र यावेळी सोनिया गांधी रायबरेली येथून निवडणूक लढवणार नाहीत. सोनिया गांधी ह्या राज्यसभेवर निवडून गेल्याने रायबरेली येथून प्रियंका गांधी किंवा नूपूर शर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
रायबरेली येथून भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असलेल्या नूपूर शर्मा ह्या विद्यार्थीदशेत एबीव्हीपीमध्ये सक्रीय होत्या. २००८ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. पेशाने वकील असलेल्या नूपूर शर्मा यांनी २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, २ वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यांना धमक्याही मिळाल्या होत्या. तसेच त्यांच्या या विधानाची प्रतिक्रिया म्हणून अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ झाली होती. मात्र आता त्यांचं राजकारणात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.