नवी दिल्ली - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीचे आव्हान मो़डीत काढत एनडीएने निसटता विजय मिळवला होता. दरम्यान या निवडणुकीत एनडीएमधील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने उपमुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार मोदी यांच्या नावावर काट मारून धक्कादायक निर्णय घेतला होता. सुशील कुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केल्यानंतर आता भाजपाने त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.बिहारमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुशीलकुमार मोदी यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहारमधील राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. या जागेचा कार्यकाळ २०२४ पर्यंत आहे. दरम्यान, बिहार भाजपामधील ज्येष्ठ नेते असलेल्या सुशीलकुमार मोदींकडे केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवलेल्या सुशीलकुमार मोदींबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 8:54 PM