कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे झाले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा पश्चिम बंगाल सरकारचा छळ करत आहे. बंगालला नष्ट करण्याचे मनसुबे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सोडले असून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो सिनेमासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
कोलकाता येथील सीबीआयच्या प्रादेशिक कार्यालयासमोरील पोलीस फौजफाटा काढून घेण्यात आला असून सीआरपीएफच्या जवानांनी या ठिकाणाचा ताबा घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तणाव; सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
तर या कारवाईवरून भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांचे सरकार परवानगी नाकारत आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडला आहे. भाजपा या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे, असे त्यांनी म्हटले.
सीबीआय अधिकाऱ्यांना शेक्सपीअर सरानी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याप्रकरणी सीबीआयचे अंतरिम प्रमुख एम नागेश्वर राव यांनी कायदेतज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या सुचनेनुसारच पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले.