कोलकाता - पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील राजकीय वैर दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याचाच प्रत्यय आज पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये आला. येथे भाजपा आमि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार बंगाल विधानसभेमध्ये भाजपा आमदार आमदार मनोज तिग्गा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजूमदार यांच्यात ही हाणामारी झाली. या हाणामारीत असित मजुमदार हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगाल विधानसभेमधून भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह पाच भाजपा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बरमन यांचा समावेश आहे. त्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कथित मारहाणीनंतर भाजपा आमदार विधानसभेतून बाहेर आले. भाजपा आमदारांनी आरोप केला की, त्यांना बीरभूम येथील घटनेवर चर्चा हवी होती. त्यावरून गोंधळ झाल्यानंतर तृणमूलच्या आमदारांनी कथितपणे धक्काबुक्की आणि हाणामारी केली.
भाजपा आमदार मनोज तिग्गा यांनी विधानसभेबाहेर आंदोलनादरम्यान सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यात माझे शर्टदेखील फाटले. त्यानंतर भाजपा आमदार आमि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, या घटनेनंतर भाजपा नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार आरोप करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएल संतोष यांनी सांगितले की, बंगालच्या राजकारणामध्ये नवे अध:पतन दिसून आले आहे. ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री बनल्यानंतर हा स्तर अधिकाधिक खालावत आहे. आज भाजपा आमदार मनोज तिग्गा आणि इतरांवर हल्ला झाला आहे.