हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदा ईशान्येकडील चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून त्रिपुरातील सत्ता टिकवून ठेवण्यात भाजपसमोर अडचणी दिसत आहेत. त्रिपुरामध्ये सत्ताधारी पक्षाचे केवळ सहयोगी पक्षच नव्हे तर आमदारही पक्ष सोडून जात आहेत. हे आमदार एक तर काँग्रेस किंवा शक्तिशाली प्रादेशिक आघाडी तिप्रा-मोथामध्ये सहभागी होत आहेत.
२०१८च्या निवडणुकीत भाजपला ६० पैकी ३६ जागा व ४३.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात आठ जागा जिंकलेला भाजपचा महत्त्वाचा सहयोगी पक्ष आयपीएफटीने भाजपला रामराम ठोकला असून, हा पक्ष काँग्रेस किंवा तिप्राशी हातमिळवणी करू शकतो. यंदा त्रिपुराच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार आहेत.
भाजपने विप्लब कुमार देव यांना हटवून डॉ. माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले असले तरी सर्व काही आलबेल नाही, ही भाजपसाठी डोकेदुखीची बाब आहे. द तिप्राह इंडोजिनस प्रोग्रेसिव्ह रिजनल अलायन्सचा (तिप्रा मोठा) राज्यातील २० आदिवासी जागांवर प्रभाव असून, या पक्षानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. भाजपसाठी आणखी एक धक्का म्हणजे भाजपच्या तीन आमदारांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तिप्राचे प्रमुख, राजघराण्याचे वंशज प्रद्योत बिक्रम माणिक्य देववर्मा जो राजकीय पक्ष मला तिप्रालँडबद्दल लेखी हमी देईल, त्याच्यासोबत मी असेन.
माकप, काँग्रेसची हातमिळवणी
आगरतळा : काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आगामी त्रिपुरा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा करून सर्वांनाच चकित केले आहे. हे दोन्ही पक्ष यापूर्वी राज्यात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. भाजपला धूळ चारण्यासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे.