Lokmat Parliamentary Awards 2023: लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा दिल्लीत झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना अनेक आठवणी, किस्से सांगत संसदीय लोकशाही आणि भारतीय संसदीय प्रणालीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम करताना त्यांची विचारणी, काम करण्याची पद्धत, एखादी गोष्ट सांगण्याची त्यांची कला कशी वेगळी होती, याबाबत विशेष आठवण सांगत, विरोधकांचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले.
नितीन गडकरी म्हणाले की, अनेकदा लोकसभा प्रचारावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. त्यात अनेक गोष्टी जवळून पाहता आल्या. तेव्हा ते म्हणायचे की, नितीन, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कितीही घाईत असलात, तरी जे लोक तुम्हाला घरी भेटायला येतात, त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कधीही बाहेर पडू नका. केवळ एक मिनिट देता आले तरी चालेल. पण त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. अटल बिहारी वाजपेयी यांना घाटकोपर येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला बोलावले होते. मंत्री होतो आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. कामकाज बंद होते. विधानसभा बंद ठेवल्यामुळे लोकशाही यशस्वी होते का, सभागृह बंद ठेवल्याशिवाय तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकत नाही का, ही जी कृती तुम्ही करत आहात. यामुळे लोकशाही मजबूत होईल का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या बोलण्यावरून ते दुःखी होते, हे समजत होते. कितीही कठोर गोष्ट असली तरी चांगल्या शब्दांत व्यक्त करता येऊ शकते, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. शब्दप्रयोग तुम्ही कसे करता, हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे नितीन गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय संसद ही जगाच्या पलटावरील एक वेगळी संसद
भारतीय संसद ही जगाच्या पलटावरील एक वेगळी संसद आहे. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याचे बोलले जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख सर्वांत मोठी लोकशाही नाही, तर ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ असा केला आहे. हे जे आपले वैशिष्ट्य आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे संपूर्ण जगभरात लोकशाही शासन प्रणालीत जे जे आदर्श आपल्या देशाने प्रस्थापित केले आहेत. ते केवळ देशासाठी नाही, तर जगासाठी आदर्श आहेत. आपल्या लोकशाही प्रणालीचे जे चार स्तंभ आहेत, त्यात सरकार, प्रशासन, न्यायालय आणि प्रसारमाध्यमे आहेत. संविधान लिहिले जात होते, तेव्हा या चारही स्तंभाची भूमिका काय असायला हवी, याबाबत सविस्तरपणे लिहिले गेले आहे. कर्तव्यही सांगितली गेली आहेत आणि जबाबदाऱ्याही सांगितल्या गेल्या आहेत. देशाचे संविधान आणि संसदीय लोकशाही प्रणाली आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
राजकारणात लोक येत असतात आणि जात असतात
विधिमंडळात असतात, ते पुढे लोकसभेत जातात. लोकसभेत येतात, ते मंत्री होतात. राजकारणात लोक येत असतात आणि जात असतात. ट्रेनमध्ये जशी स्थिती असते, लोक चढ-उतार करत असतात. तशीच स्थिती आपल्या संसदेत आहे. संसदेत जी मंडळी येतात, स्वाभाविकपणे त्यांनी संसदेत आपले म्हणणे मांडणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा ज्या क्षेत्रातून ते येतात, तेथील लोकांसाठी जबाबदार लोकप्रतिनिधीप्रमाणे कसे काम करतात, हे महत्त्वाचे आहे. काही जण पॅराशूट लँडिंगप्रमाणे थेट संसदेत येतात. तर काही जण अगदी सरपंच, पंचायत निवडणुका लढत लढत संसदेपर्यंत पोहोचतात. या दोन्ही पद्धतीने आलेल्यांच्या कामात खूप फरक असतो. जे छोट्या स्तरावर काम करतात, ते लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवणे, त्यांच्या समस्या सोडवणे, हे खूप कठीण काम आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, अनेकदा असे होते की, जे संसदेत बोलतात, चर्चा करतात, त्यांचे लक्ष नेहमी मीडिया गॅलरीकडे असते. मात्र, जो शांतपणे बोलत असतो, त्याबाबत मीडियात असे येते की, याला मॅनेज केले आहे. आणि तावातावाने बोलतात, त्यांच्याबाबत असे येते की, यांचा व्यवहार जबाबदारीपूर्ण नाही. कधीकधी दोन्ही बाजूने गोष्टी ऐकायला येतात. पब्लिसिटी आणि प्रसिद्धी दोन्ही महत्त्वाचे असते, असे नितीन गडकरी म्हणाले.