कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा वाद देवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले पार्थ चटर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक दावा चटर्जी यांनी केला आहे. पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये जेव्हा लहान मुलांना आणि यादव समुदायाचा लोकांना मारले गेले त्यावेळी भाजप नेते कुठे होते. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून , तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्याच्या घटना भाजपकडून घडवून आणल्या जात असल्याचा गंभीर आरोप चटर्जी यांनी केला आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे ही चटर्जी म्हणाले. दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थिती कळणार नाही असेही चटर्जी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. तर दुसरीकडे आज पश्चिम बंगालमध्ये भाजप काळा दिवस पाळणार असून १२ तास बंदची हाक देण्यात आली आहे.