श्रीनगर: निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर होत असल्याचा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केला आहे. भाजपाला जवानांची आणि काश्मिरींची कोणतीही चिंता नसल्याचंदेखील मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर मुफ्ती नजरकैदेत आहेत. मेहबूबा मुफ्ती नदरकैदेत असल्यानं त्यांची कन्या इल्तिजा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळते. इल्तिजा यांनी मेहबूबा यांच्या वतीनं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 'भाजपाकडून जवानांचा वापर होत आहे. जवानांचं शौर्य आणि त्यांचा त्याग मतांसाठी वापरला जात आहे. काश्मीर खोऱ्यातील अशांतता कायम राखण्यासाठी जवानांना प्यादं बनवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांना काश्मिरींची आणि जवानांची चिंता नाही. त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यात रस आहे,' असं ट्विट मुफ्तींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. लष्कराचा वापर आंदोलकांना भिडण्यासाठी नव्हे, तर सीमांचं संरक्षण करण्यासाठी व्हायला हवा, असंदेखील मुफ्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर मग इथे ९ लाख जवान काय करत आहेत? ते पाकिस्तानकडून होणारे हल्ले परतवण्यासाठी नव्हे, तर आंदोलकांना चिरडण्यासाठी काश्मीरमध्ये आहेत. आंदोलन मोडून काढणं हे लष्कराचं काम नाही. सीमांचं संरक्षण करणं ही लष्कराची जबाबदारी आहे,' अशा शब्दांमध्ये मुफ्तींनी भाजपा सरकावर निशाणा साधला आहे.