अहमदाबाद - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी या प्रकरणात भाजपाकडून सुरू असलेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली. ''कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे. याआधी पूर्वोत्तर भारतामध्येही त्यांनी याचप्रकारे सत्तांतर घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे.'' असे राहुल गांधी म्हणाले.
अहमदाबादमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथे आले होते. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील घटनाक्रमावरून भाजपावर जोरदार टीका केली. दरम्यान, कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.
कर्नाटकातील जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.