ऑनलाइन लोकमतकोइम्बतूर, दि. 14 - मणिपूरमध्ये सत्तेचा तिढा कायम असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मणिपूर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं वारेमाप पैसा आणि शक्तीचा वापर केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी केला आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 28 जागा मिळून क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे. मात्र तरीही मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपाने दावा केला आहे. मणिपूरमध्ये भाजपा दोन नंबरचा पक्ष ठरला असतानाही भाजपाकडून एन. बिरेन सिंह यांची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. इरोम शर्मिला विमानानं केरळला जात असताना त्यांनी कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पत्रकारांशी संवाद साधला. मणिपूरमधील पराभवामुळे इरोम शर्मिला केरळमधल्या मेडिटेशन सेंटरमध्ये एक महिना व्यतित करणार आहेत. निवडणुकीच्या निकालानं मी निराश आहे. त्यामुळेच महिन्याभरासाठी राज्य सोडण्याचा विचार केला आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. इरोम शर्मिला यांना मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शर्मिला यांना अवघी 90 मते मिळाल्यानं राजकीय वर्तुळात त्या चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने सुरुवातीला निवडणुकीत पैसा आणि शक्तीचा वापर केला. आता सत्ता स्थापनेतही तेच करण्यात येत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला लक्ष्यही केलं आहे.(मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा राजीनामा) मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा सोमवारी रात्री उशिरा राजीनामा दिला. ओकराम इबोबी सिंह यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे राज्यपाल नजमा हेमतुल्ला यांनी सांगितले होते. यावर, ओकराम इबोबी सिंह यांनी कॉंग्रेसकडे बहुमत असल्याचा दावा करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर काही तासानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.