पिलिभीत: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते वरुण गांधी (Varun Gandhi) केंद्रातील मोदी सरकार आणि आपल्याच पक्षावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी कधीही भाजपला रामराम करू शकतात, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीच्या दिवशी गोडसे (Nathuram Godse) जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिली पाहिजे, असे टीकास्त्र वरुण गांधी यांनी सोडले.
आपल्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वरुण गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचे आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे, असे वरुण गांधी म्हणाले.
आता जय श्रीराम नाही, जय हिंद म्हणायची वेळ आलीय
मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. आता जय श्रीराम नाही, तर जय हिंद म्हणायची वेळी आली आहे, असेही वरुण गांधी यांनी म्हटले आहे.
गोडसेंचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे
महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिले पाहिजे. भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता, असेही ते म्हणाले.