नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून देशभरात मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाने भाजपहसह मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या कालावधीत झालेल्या मृत्यूमुळे केंद्राविरोधात संतापाची लाटही उसळली होती. मात्र, या सगळ्या घडामोडीतही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक जिंकली. यावर देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाष्य करत यामागील राजकारण सांगितले.
नोंटबंदीमुळे देशभरात विरोधाची लाट असताना आपल्या संवाद कौशल्यामुळे नरेंद्र मोदी निवडणुका जिंकले. निवडणुका जिंकण्याची क्षमता नरेंद्र मोदींमध्ये होती. कारण, ते कायम जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेशी संवाद साधत राहिले. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. देशवासीयांचा विश्वास आणि संवाद, संपर्क कौशल्याचा बळावर नरेंद्र मोदी जिंकले, असे नायडू यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या गुजरात आणि केंद्रातील २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवरील एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नायडू बोलत होते.
नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती नाही
नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, त्यांची स्वप्न, संकल्प आणि मिशन इंडिया या व्यापक यात्रा आणि व्यवहारातील प्रेरणा आहे. हाच मूलभूत फरक नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समकालिन सार्वजनिक नेत्यांमध्ये होता. त्यामुळे नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती दिसणार नाही. नरेंद्र मोदींएवढा अनुभव असणारा नेता दुसरा नसेल. गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी आपले वेगळे स्थान देशाच्या राजकारणात निर्माण केले, असे गौरवोद्गार नायडू यांनी काढले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंवर उहापोह करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीपासून ते त्या काळातील त्यांच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात अनेकांचे विचार आणि अनुभव आहेत.