नवी दिल्ली - तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या दोन्ही मुली लष्कराच्या विशेष विमानाने आईवडिलांच्या अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचल्या होत्या. अस्थी गंगा नदीत विसर्जन केल्या. आईवडिलांच्या अस्थी विसर्जन करताना दोन्ही मुली भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच या घटनेने संपूर्ण देश हळहळला.
देशभरात विविध ठिकाणी आदरांजली वाहिली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील भाजपा आमदार विनोद कटियार (BJP Vinay katiyar) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कटियार शहिदांना श्रद्धांजली वाहताना हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. माजी प्रशासकीय अधिकारी (IAS) सूर्य प्रताप सिंह यांनीही हा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
सूर्य प्रताप सिंह यांनी "कानपूरचे भाजपा आमदार विनोद कटियार यांची हसत-हसत श्रद्धांजली पाहा" असं म्हणत फोटो ट्विट केला आहे. अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट केलं आहे. तसेच यावर संताप व्यक्त केला आहे. वाईट घटनेवर दुःख व्यक्त करत असताना कोणं हसू कसं शकतं असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय काही लोकांनी भाजपावर निवडणूक असल्याने शहिदांचा मतांसाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर काहींनी हाच तुमचा राष्ट्रवाद का? असा प्रश्न विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.