भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 22:32 IST2019-03-29T22:30:37+5:302019-03-29T22:32:09+5:30
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे.

भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध
बंगळुरु : तुमकुरच्या काँग्रेस खासदाराचे तिकीट कापून जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा यांना ती जागा दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यातच आज कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जेडीएसचे नेते एच डी रेवन्ना यांना अपमानाचा सामना करावा लागला आहे. देवेगौडांचा नातू आणि रेवन्नांचा मुलगा प्रज्वल याला मत घालण्यापेक्षा आम्ही भाजपाला मत घालू, असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरसभेत दिला आहे. प्रज्वल हे हासन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. या ठिकाणीही काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. यामुळे तिन्ही जागांवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध देवेगौडांना होत आहे. हासन मतदारसंघाचे नेतृत्व यापूर्वी देवेगौडा करत होते.
शुक्रवारी एका सभेमध्ये रेवन्ना यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जेडीएस उमेदवाराला मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यास साफ नकार दिला. धक्कादायक म्हणजे रेवन्ना हे हातामध्ये 6-7 लिंबू घेऊन गेले होते. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर मोठा विश्वास आहे.
ज्याची भीती होती तेच घडले...
रेवन्ना हे हातात लिंबू कधी ठेवत नाहीत. आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या राजकीय वाटचालीत अडचणी येऊ नयेत यासाठी ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार लिंबू ठेवली होती. मात्र, जे व्हायचे तेच घडले. ते जेव्हा मंचावरील खुर्चीवर बसले तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच जेडीएसला समर्थन देण्याऐवजी भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा इशारा दिला. मंचावरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो अयशस्वी ठरला. काँग्रेसचे आम्ही बांधलेले नाही. कट्टर काँग्रेसी असले तरीही जेडीएस नको. भाजपालाच्या उमेदवाराला मतच घालणार नाही, तर त्यांच्या उमेदवारासाठी मतेही मागणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.