Parliament Budget Session : लंडनमधील भाषणामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि अदानी प्रकरणी जेपीसीची स्थापना करावी, या मागणीवरुन सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे शुक्रवारी (17 मार्च) संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच सरकार आणि विरोधकांमध्ये गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे देशातील दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
जेपी नड्डांची टीकाराहुल गांधींच्या लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप त्यांच्या माफीची मागणी करत आहे. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सकाळी 9:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि राहुल यांना माफी मागावी लागेल असे सांगितले. 'राहुल गांधी कायमच देशविरोधी टूलकिटचा भाग बनले आहेत. त्यांनी देशातील 130 कोटी नागरिकांचा आणि संसदेचा अपमान केला आहे,' अशी टीका त्यांनी केली.
मल्लिकार्जुन खर्गेंचा पलटवारभाजप प्रमुखांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विधानावर पलटवार केला. 'स्वतः नड्डा देशद्रोही आहेत, म्हणूनच ते इतरांना देशद्रोही म्हणत आहेत. त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. सरकारने राहुल गांधींना संसदेत बोलू दिले, तर ते नक्कीच स्पष्टीकरण देतील,' असे खर्गे म्हणाले.
विरोधकांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शनेसंसदेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत पोहोचले. राहुल गांधी संसदेत पोहोचताच भाजप खासदारांनी शेम-ऑन शेम-ऑन घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रचंड गदारोळामुळे संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेचे कामकाज थांबताच विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी गांधी पुतळ्यासमोर जमिनीवर बसून विरोध करण्यास सुरुवात केली. या निदर्शनात विरोधी खासदारांसोबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही आल्या आणि त्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.