नवी दिल्ली: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(KCR) आणि भाजप यांच्यातला संघर्ष वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केसीआर यांचा पक्ष टीआरएस(TRS) भाजपवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेलंगणा दौऱ्यावर गेले होते, तिथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर आता टीआरएसने भाजपवर गुजरातीतून टीका केली आहे.
एकेकाळी भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे केसीआर गेल्या काही महिन्यांपासून भाजपविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपच्या हैदराबादमधील बैठकीनंतर केसीआर यांनी भाजपवर गुजराती भाषेतून निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी टीआरएसने गुजराती भाषेतून राज्याचा विकास सांगितला. तर, भाजपनेही एमआयएम(AIMIM) आणि टीआरएस पक्षाचे संबंध दाखण्यासाठी उर्दूमधून प्रत्युत्तर दिले.
टीआरएसची गुजरातीतून टीकाटीआरएसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून गुजराती भाषेमधून तेलंगाणातील विकास दाखवणारे मुद्दे मांडले. 'टीआरएस सरकारने तेलंगणात केलेला अभूतपूर्व विकास ओळखण्यात मोदी आणि त्यांचा पक्ष अपयशी ठरला आहे. पंतप्रधानांच्या पसंतीच्या भाषेत तेलंगणातील कामगिरी येथे आहेत,' असे कॅप्शन टीआरएसने प्रश्नांसोबत दिले.
भाजपचा उर्दुतून पलटवारटीआरएसकडून भाजपवर गुजराती भाषेत टीका केल्यानंतर भाजप उर्दुतून पलटवार केला. भाजपने टीआरएस-एआयएमआयएम मैत्रीचे संकेत देण्यासाठी उर्दुचा वापर केला. भाजपकडून टीआरएस सरकारचे अपयश मांडण्यात आले. यात शेतकरी आत्महत्या, सोनेरी तेलंगणाचे अधुरे स्वप्न आणि कर्जाचा मुद्दा आहे.