राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "भाजपाला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करायची होती. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले होते, पण त्यापूर्वीच त्याचा पर्दाफाश झाला. भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती."
अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमधील छाप्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राजस्थानमध्ये इतके छापे टाकण्यात आले पण कोणत्या राजकीय नेत्याला अटक झाली का? असा सवाल त्यांनी केला. "आमच्या सरकारने खूप काम केलं आहे. भाजपाला काही सांगायचे असेल तर त्यांनी आमच्या योजनांमधील त्रुटी दाखवून द्याव्यात. केवळ भडकवण्याचे राजकारण केले जात आहे."
"भाजपाला जनतेला भडकावण्याचा अधिकार नाही. ज्यांनी कन्हैया कुमारची हत्या केली ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर अनेक खटले असून भाजपा नेत्यांनी त्यांना मदत केली. आज भाजपा वृत्तपत्रांतून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करत आहे. तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या काळात जयपूरमध्ये बॉम्बस्फोट झाले होते" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.
लाल डायरीबद्दल अशोक गेहलोत म्हणाले की, "निवडणुका जिंकण्याचा हा भाजपचा डाव आहे. लाल डायरी प्रकरणात काय झाले याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. आजच्या घडीला भाजपाकडे निवडणुकीचा कोणताही मुद्दा नाही. राज्यात काँग्रेसविरोधी आणि सरकारविरोधी लाटेबाबत बोललं जात असताना मी तुम्हाला सांगतो की, तसं काही नाही."
"केरळप्रमाणेच राजस्थानमध्येही सरकारची पुनरावृत्ती होणार आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने आजपर्यंत जिंकू न शकलेल्या अनेक जागा यावेळी जिंकू. भाजपाला आमच्या कामात अडचण आहे, चिरंजीवी योजनेची अडचण आहे, Ops मध्ये अडचण आहे, नवीन जिल्हे निर्माण करण्यात अडचण आहे. राजस्थानची जनता भाजपाला धडा शिकवेल."