कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपाला गळती लागली आहे. भाजपाचे अनेक आमदार आणि नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, आज भाजपाला पुन्हा मोठा धक्का बसला असून, प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी हिने भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. बंगालबाबत भाजपामध्ये गांभीर्य आणि लोककल्याणाची भानवा नसल्याचा आरोप तिने पक्ष सोडताना केला आहे. बंगालची विधानसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत पाच आमदार, माजी मंत्री आणि खासदार बाबूल सुप्रियो यांच्यासह अनेक नेत्यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी हिने भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. बंगालमध्ये त्याआधीही अनेक अभिनेते आणि अभिनेत्री भाजपामध्ये सहभागी झाले होते. मात्र निवडणुकीनंतर त्यातील अनेकांनी पक्ष सोडला आहे.
श्राबंती चटर्जी बंगाली चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ३४ वर्षीय श्राबंतीने १९९७ मध्ये बंगाली चित्रपट मायार बंधोनमधून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने एकाहून एक प्रसिद्ध सुपरहिट चित्रपटात काम केले होते. हल्लीच ती लॉकडाऊन या चित्रपटात दिसली होती. तिने अनुराग बासू यांच्या लव्ह स्टोरी, वक्त आणि लेडिज स्पेशल या मालिकांमध्ये काम केले आहे.
श्राबंती चटर्जी केवळ चित्रपटांमुळेच नव्हे तर तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. आता श्राबंती ही तिचे तिसरे लग्न संपुष्टात आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. श्राबंतीचा पहिला विवाह राजीव कुमार बिस्वास यांच्याशी झाला होता. ते लग्न संपुष्टात आल्यावर मॉडेल कृष्ण वज्र याच्याशी दुसरे लग्न केले होते. त्याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर श्राबंतीने २०१९ मध्ये रोशन सिंह याच्याशी विवाह केला. मात्र आता १६ सप्टेंबर रोजी तिने रोशन सिंह याच्याकडून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला आहे.