ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्वेक्षण चाचण्याच्या बिलकुल विपरीत मतप्रदर्शन केले आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष दोन तृतीयांश जागा जिंकून सत्तेत येईल. भाजपाचा दारुण पराभव होईल असे काटजू यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहीले आहे.
भाजपाला मायावतींच्या बसपापेक्षा कमी जागा मिळतील असे काटजू यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधी विविध सर्वेक्षण चाचण्यांनी भाजपाच्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे. बहुतांश राज्यात उत्तरप्रदेशात जाती, धर्माच्या आधारावर मतदान होते. ज्यावेळी एखादी लाट असते उदहारणार्थ मोदी लाट त्यावेळी जाती, धर्माचा आधार चालत नाही. सध्या अशी कुठलीही लाट नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे जाती, धर्माच्या आधारावर मतदान होईल.
नोटाबंदीतून कुठलीही लाट निर्माण झाली नाही. नोटाबंदीमुळे भाजपाला फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो. कारण सामान्य माणूस, व्यापारी, शेतकरी, या सर्वांना नोटाबंदीचा त्रास झाला आहे असे काटजू यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहीले आहे.