ऑनलाइन लोकमत, नवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यसभेतील भाजपाचं संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढणार आहे. लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यसभेत काँग्रेसच्या विरोधामुळे अनेकदा धूळ खात होते. मात्र आता राज्यसभेतही भाजपा काँग्रेसला न जुमानता कोणतंही विधेयक मंजूर करून घेऊ शकणार आहे. येत्या वर्षभरात राज्यसभेतलं भाजपाचं संख्याबळ लक्षणीय वाढणार आहेत. तसेच जुलैमध्ये होऊ घातलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूकही भाजपाला सोपी जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील विजयामुळे राज्यात भाजपा खासदारांची संख्या 10ने वाढणार असून, राज्यसभेत भाजपाला कोणतंही विधेयक मंजूर करणं सहजशक्य होणार आहे. राज्यसभेतील 68 खासदारांपैकी 58 खासदार एप्रिल 2018मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यातील 10 खासदार हे उत्तर प्रदेशातून आहेत. तर एक उत्तराखंडमधील आहे. सध्या राज्यसभेत रालोआचे 73 आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे 71 सदस्य आहेत. संख्याबळानुसार संपुआपेक्षा रालोआ वरचढ आहे. पण बहुमताच्या आकड्यापासून रालोआ अजूनही मागे आहे. तसेच मणिपूर आणि पंजाबमधून राज्यसभेसाठी कोणतीही जागा खाली होणार नाही. त्यामुळे या दोन्ही राज्यांचा राज्यसभेच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. गोव्यातून राज्यसभेसाठी एक जागा भरण्यात येणार आहे. तसेच राज्यसभेतून 9 सदस्य निवृत्त होणार असून, त्यात गुजरात 3 आणि पश्चिम बंगालमधील 6 सदस्यांचा समावेश आहे. दिल्ली, केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात आणि तेलंगणामधूनही काही जागा रिक्त होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोदींना आपल्या पसंतीचा उमेदवार देता येणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील उमेदवारांच्या मतांवरच उपराष्ट्रपतीसुद्धा निवडला जात असल्याने पाच राज्यांच्या निकालाचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.
भाजपा राज्यसभेत होणार मजबूत, राष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाणार सोपी
By admin | Published: March 12, 2017 9:31 AM