- संजय शर्मा
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग अयोध्येतून फुंकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे सर्व छोटे-मोठे नेते आणि कार्यकर्तेही वेगवेगळ्या दिवशी अयोध्येला जाणार आहेत. २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यानंतर भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांसह अयोध्येला भेट देणार आहेत.
एकप्रकारे भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण पक्षसंघटनेला अयोध्येला बोलावून येथूनच ‘जय श्री राम’चा नारा देऊन त्यांना उत्साही करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून १० हजार ते १ लाख कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही संख्या राज्यांच्या क्षमतेनुसार ठरविली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानलाही लक्ष्य दिले आहे.
विधानसभा मतदारसंघातून दोन हजार कार्यकर्ते येणारसर्व राज्यांतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार कार्यकर्त्यांना अयोध्येला पोहोचण्यास सांगितले आहे. सर्वच राज्यांतील भाजप प्रदेशाध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सर्व साधू-संत पुढे आले आहेत. पुढील दोन महिने अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्याचे साधू-संतांनी ठरवले आहे.
सरचिटणीस तरुण चुघ यांच्याकडे जबाबदारीपुढील दोन महिन्यांत दररोज एक लाख कार्यकर्ते अयोध्येला जातील. ही संख्या सुमारे ५० ते ६० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने ‘मिशन अयोध्या’ची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांच्याकडे दिली आहे.