नवी दिल्ली - पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपची साथ सोडली आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचे बादल यांनी जाहीर केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अकाली दल स्वतंत्र निवडणूक लढवेल, असे बादल यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपच्या गोटातून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडल्याचे दिसून आहे. यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.
आगामी 2019 च्या निवडणुकांपूर्वी भाजपचे मित्रपक्षांकडून भाजपला जय श्रीराम करण्यात येत आहे. अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पिपरी नगरमधील धान्याच्या बाजारात पक्षाच्या सभेत बोलताना ही घोषणा केली. आम्ही पंजाबमध्ये जे वचन दिले होते ते पूर्ण केले, आता हरयाणातील लोकांच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे बादल यांनी म्हटले. तसेच हरयाणामध्ये एक नवीन इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी अकाली दलाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच राज्यात आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा देणार असल्याचेही बादल यांनी म्हटले. दरम्यान, अकाली दलाने यापूर्वी भाजपसोबत निवडणुका लढवल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकांमध्येही अकाली दलाने भाजपसोबत निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.