शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात भाजपाच्या बाजूने कौल मिळत आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीतही हा कौल दिसून आला, असे सांगतानाच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच जिंकून सत्तेवर येईल, असा दावा मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. महाराष्ट्रात सरपंचाची निवड थेट करण्याची ही पहिली वेळ होती आणि त्यातही भाजपाला मोठे यश मिळाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा पुढे आला आहे, असेही जावडेकर म्हणाले.‘लोकमत’समूहाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्याशी जावडेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थतीवर विस्तृत चर्चा केली. शास्त्री भवन येथील कार्यालयात झालेल्या या चर्चेत प्रकाश जावडेकर यांनी दावा केला की, कर्नाटकात दौरा केल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत आले आहेत की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर येईल. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी जावडेकर यांनी सांगितले की, तेथील जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे भाजपावरील लोकांचा विश्वास वाढत आहे. कर्नाटकचे प्रभारी असलेल्या जावडेकर यांनी दौºयातील अनुभवांच्या आधारे हे निष्क र्ष मांडले आहे.जीएसटीवरुन लोकांत नाराजी आहे काय? असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला असता जावडेकर म्हणाले की, जीएसटीचे चांगले परिणाम समोर येत आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी करांच्या बाबतीत जो दिलासा दिला आहे, त्याचे लोकांनी स्वागत केले आहे आणि लोक समाधानी आहेत.लोक आजही पंतप्रधान मोदी यांना पसंत करतात आणि त्यांच्या नावावर मत देतात, याचा पुनरुच्चार करून जावडेकर म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी जी मोहिम सुरु केली आहे त्याचे परिणाम समोर येत आहेत. रिटर्न फाइल करण्याच्या बाबतीत कर दात्यांच्या संख्येत मोठे परिवर्तन पहायला मिळतआहे. आगामी काळात याची कक्षा आणखी रुंदावेल आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.दत्तक गावावरून फिरकी -छिंदवाडामधील एक गाव आम्ही दत्तक घेतले आहे, असे सांगताना जावडेकर यांनी फिरकी घेत सांगितले की, कमलनाथ यांच्या मतदारसंघातील या गावात भरपूर विकास कामे केली जात असून, आम्ही हे गाव आणि कमलनाथ यांनाही दत्तक घेतले आहे.
कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येईल, प्रकाश जावडेकर यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:40 AM