संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अब की बार ४०० पार ही घोषणा भाजपने केल्यानंतर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भाजपच्या वाढत्या जागांची किंमत सहकारी पक्षांना चुकवावी लागू शकते. त्यासाठी भाजपला महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागांवर निवडणूक लढवायची आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. राज्यातील सहकारी पक्षांना लोकसभेच्या जागांची परतफेड विधानसभेत दिली जाईल, असेही सांगितले जात आहे. अब की बार ४०० पार ही घोषणा भाजपने केल्यानंतर आता या जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भाजपच्या वाढत्या जागांची किंमत सहकारी पक्षांना चुकवावी लागू शकते.
२०१४ मध्ये २८४ जागा आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकल्यानंतर भाजपने २०२४ मध्ये यावेळी ४०० जागांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपला यावेळी देशभरात ४७५ हून अधिक जागांवर निवडणूक लढवायची आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी भाजपला महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागांवर निवडणूक लढवायची आहे. गेल्या वेळी भाजपने राज्यात २५ जागांवर निवडणूक लढवली होती. भाजप राजस्थानच्या सर्व २५ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या वेळी भाजपने राजस्थानची एक जागा हनुमान बेनिवाल यांना युतीत दिली होती.
कोणत्या राज्यात काय परिस्थिती?
- झारखंडमधील सर्व १४ जागांवर भाजप एकटाच लढणार आहे. गेल्या वेळी भाजपने आजसूला एक जागा दिली होती.
- हरयाणात भाजपसोबत युती करणारा दुष्यंत चौटाला यांचा पक्ष आयएनएलडीला दोन जागा देण्यास भाजपने स्पष्टपणे नकार दिला असून राज्यातील सर्व १० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
- बिहारमध्येही भाजप ३० ते ३१ जागांवर निवडणूक लढवणार असून मित्रपक्षांसाठी केवळ ९ ते १० जागा सोडणार आहे.
- उत्तर प्रदेशातही अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला दोनच जागा देण्याची चर्चा आहे. ओमप्रकाश राजभर आणि संजय निषाद यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे.