भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:00 PM2024-02-14T15:00:24+5:302024-02-14T15:01:47+5:30
भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली - राज्यातील राज्यसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्या १५ फेब्रुवारी असून महाराष्ट्रातील ६ जागांसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांची उमेदवारी राज्यसभेसाठी जाहीर केल्यानंतर आता महायुतीनेही ४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, अजित पवार यांच्याकडील उमेदवाराची घोषणा अद्याप झाली असून लवकरच तीही घोषणा होईल. मात्र, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठीही ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यास भाजपा नेत्या आणि आमदारकीवेळी आपली जागा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनाही भाजपाने संधी दिली आहे. तर, भाजपाकडून डॉ. अजित गोपछडे यांनाही संधी मिळाली आहे. भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्यामुळे आता भाजपाकडून तीनच जागा लढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपा चार जागांवर उमेदवार देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
महायुतीच्या ४ उमेदवारांची घोषणा झाली असून भाजपने ३ तर शिवसेना शिंदे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून माजी खासदार व काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीचे ४ जागांवरील उमेदवार निश्चित झाले असून अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून बाबा सिद्दिकी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सहा जागांपैकी ५ जागांवरील उमेदवार घोषित झाले आहे. त्यामुळे, भाजपाकडून तीन, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ अशा एकूण ६ जांगावर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.