नवी दिल्ली : लोकसभेची सेमीफायन समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये तीन राज्यांत काँग्रेसला बहुमत स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला.
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा अहंकारामुळे पराभव झाला आहे. भाजपाने जरी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरीही आम्ही भाजपाला पराभूत करु, मात्र भाजपामुक्त करणार नाही. कारण, त्यांच्यासारखी भाषा आम्ही वापरु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय हा शेतकरी, व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ही परिवर्तणाची सुरुवात असून जनमताचा आवाज ऐकून कामे करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
देशासमोर आत्ता सगळ्यात मोठे तीन मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्रात विरोधकांची एकजूट आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे, त्यामुळे भाजपाविरोधात आम्ही एकत्र लढू असे राहुल गांधी म्हणाले.
लोकांशी समरस कसे व्हायचे त्यांच्या मनात काय आहे हे कसे ओळखायचे हे मी नरेंद्र मोदींकडून शिकलो. त्या निवडणुकांमध्ये आमचा पराभव झाला. मोदींना देशाच्या जनतेने, उद्योजकांनी, शेतकऱ्यांनी युवा वर्गाने निवडले आणि त्यांना एक मोठी संधी दिली.
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांन्ही म्हटले आहे.