दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:40 AM2019-05-07T05:40:32+5:302019-05-07T05:42:28+5:30
गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.
पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी मोदी यांनी आश्वासने पूर्ण कशी केली नाहीत, याची उदाहरणेच दिली. ते म्हणाले की, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणलेली नमामी गंगे योजना २0१९ पर्यंत संपेल, असे सांगितले होते. त्यासाठी २0 हजार कोटींची तरतूद केली. त्यापैकी केवळ ६ हजार कोटी रुपयेच खर्च केले. योजनेतील ट्रीटमेंट प्लांटचे काम १0 टक्केच पूर्ण झाले असून, वाराणसीत गंगा आजही सर्वाधिक प्रदूषित आहे.
जालियनवाला बाग हत्याकांड ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: मोदी आहेत. पण पाच वर्षांत त्यांनी ट्रस्टची एकही बैठक घेतली नाही वा ट्रस्टवर एकाचीही नेमणूक केली नाही. ट्रस्टमार्फत कामे करण्यासाठी ४0 कोटींची घोषणाही केली. पण तो निधी दिलाच नाही, अशी टीका त्यांनी केली. अडीच लाख गावांमध्ये फेब्रुवारी २0१९ पर्यंत डिजिटल इंडिया योजनेद्वारे इंटरनेट कनेक्टिविटी पोहोचवू, असा दावा केला. पण अद्याप १ लाख १ गावांमध्येच इंटरनेट पोहचले आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २0२0 पर्यंत ४0 कोटी लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला होता. पण आतापर्यंत ४१ लोकांनाच प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून रोजगार मिळालेल्यांची संख्या ६ लाखच आहे, असे ते म्हणाले.
स्मृती इराणी या तर रडणारे बाळ
अमेठीमध्ये काँग्रेसतर्फे बुथ कॅप्चरिंग सुरू असल्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या आरोपाचा समाचार घेताना सिद्धू म्हणाले की, इराणी या तर सतत रडणारे बाळ आहेत. त्या सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकलेल्या नाहीत. दिल्लीत त्या पराभूत झाल्या, अमेठीमध्येही त्यांचा पराभव झाला. आताही त्यांचा पराभव अटळ आहे. त्यामुळेच त्या असले आरोप करीत आहेत.