कर्नाटकची यंदाची विधानसभा निवडणूक भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आधीच कर्नाटकात काँग्रेसला अच्छे दिन असल्याचे वारे आहेत. त्यात भाजपाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली, तो भाजपासाठी बॉम्बच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...
भाजपाने १८९ जागांवर उमेदवार जाहीर केले. यात ११ आमदारांचे पत्ते कापण्यात आले. या यादीत एक नाव असे आहे, जे भल्या मोठ्या भूभागावर वर्चस्व गाजवते. के एस ईश्वराप्पा. ईश्वराप्पांनी उमेदवार यादी येण्यापूर्वीच संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आणि भाजपात मोठा भूकंप आला आहे. उमेदवारी न देण्यावरून नाराजी जरी त्यांनी व्यक्त केलेली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
शिवमोग्गाचे जिल्हाध्यक्षांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. तसेच अन्य नेते देखील राजीनामा देण्याचे म्हणत आहेत. १९ नगर परिषदांच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भाजपाने ईश्वराप्पांच्या राजीनाम्याला महत्व न देण्याचे ठरविले आहे. तरुण नेतृत्वासाठी ईश्वराप्पांनी जागा खाली केली, असा प्रचार केला जात आहे. ईश्वराप्पांना ७५ वर्षे होणार आहेत. यामुळे भाजपातील अलिखित नियमानुसार ते आता सिनिअर सिटिझन नेत्यांमध्ये मोडतात. तसेही ईश्वराप्पांमुळे भाजपाला नुकसान झालेले आहे. कामात ४० टक्क्यांचे कमिशनचा जो आरोप भाजपावर होतोय ते त्यांच्यामुळेच. यामुळेच ईश्वराप्पांना मंत्रिपद गमवावे लागले होते. नंतर त्यांना क्लिन चिट देण्यात आली होती.