- हरिश गुप्तानवी दिल्ली - लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भारतीय जनता पार्टी ४३५ जागा लढवणार असून, उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. गेल्या म्हणजे २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२९ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते.यंदा रालोआमधून तेलगू देसम, राष्ट्रीय लोकशक्ती पार्टी व अन्य पक्ष बाहेर पडले असल्याने भाजपाला ७ ते १0 जागा अधिक लढवता येणार आहेत. भाजपाला याहून अधिक जागा लढवता आल्या असत्या, पण यंदा बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)शी भाजपाचा समझोता झाला आहे. त्या पक्षासाठी भाजपाला आपल्या वाट्यातील पाच जादा जागा सोडाव्या लागल्या आहेत. त्या जागांवर गेल्या वेळी भाजपा विजयी झाली होती.तिथे जागांचे नुकसान झाले असले, तरी भाजपाचा तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकशी समझोता झाला असून, तिथे भाजपाला पाच जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळी भाजपाने तामिळनाडूमध्ये ९ उमेदवार उभे केले होते आणि एकच उमेदवार विजयी झाला होता. तेव्हा भाजपाचा तिथे कोणाशीही समझोता झाला नव्हता. केरळमध्ये २0 जागा असल्या, तरी भाजपा १४ ठिकाणीच उमेदवार उभे करणार असून, ६ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. झारखंडमध्येही भाजपाने यंदा आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनशी समझोता करून १ जागा सोडली आहे. उरलेल्या जागांवर भाजपाच लढेल.भाजपाचे विविध राज्यांत मिळून ४0 मित्रपक्ष आहेत, पण चार पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिशा या राज्यांत भाजपाचा एकही मित्रपक्ष नाही. या राज्यांत भाजपा स्वबळावच लढणार आहे. पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये २0१४ साली सर्व जागा लढविल्या होत्या आणि दोन्हीकडे मिळून तीन जागा जिंकल्या होत्या. आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये असलेल्या ४२ जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले होते आणि त्यातील तिघे विजयी झाले होते.ओडिशा, बंगालवरच लक्षयंदाही या राज्यांत जवळपास सर्व जागा भाजपा लढत आहे, पण तिथे आता भाजपाची फारशी ताकद दिसत नाही. अर्थात, वायएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश) व तेलंगणा राष्ट्र समिती (तेलंगणा) यांच्या संपर्कात आहे.निवडणूक निकालांनंतर गरज भासल्यास हे पक्ष मदत करू शकतील, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळे आंध्र व तेलंगणापेक्षा पश्चिम बंगाल व ओडिशावरच भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय काँग्रेसचा उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये अनुक्रमे सपा-बसपा आघाडी व आम आदमी पक्षाशी समझोता न झाल्याने भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजपा लढणार लोकसभेच्या ५४३ पैकी केवळ ४३५ जागा, उरलेल्या जागा मित्रांना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:59 AM