नवी दिल्ली : २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले. आणीबाणीच्या काळात अमानुष यातना सहन करणाऱ्यांच्या योगदानाचे या दिवशी स्मरण करण्यात येईल, असे शाह म्हणाले.
यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली. २५ जून १९७५ रोजी केंद्रातील सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आणि भारतातील नागरिकांवर अत्याचार केले, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
आणीबाणीत संविधान पायदळी तुडविल्यामुळे काय झाले याची आठवण २५ जून रोजी पाळण्यात येणारा ‘संविधान हत्या दिन’ नेहमी जागती ठेवणार आहे - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेसचा ४ जूनला ‘मोदीमुक्ती दिन’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून अघोषित आणीबाणी लागू केली. लोकसभा निवडणुकांचा गेल्या ४ जून रोजी निकाल लागला. या निवडणुकांत भारतीय जनतेने पंतप्रधान मोदी यांचा राजकीय व नैतिक स्तरावर पराभव केला. हा दिवस इतिहासात ‘मोदीमुक्ती दिन’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली.
मोदींची ज्यांच्याशी वैचारिक बांधीलकी आहे, त्या परिवाराने १९४९ साली राज्यघटना नाकारताना मनुस्मृतीपासून राज्यघटनेने प्रेरणा घेतली नसल्याचे कारण दिले होते - जयराम रमेश, काँग्रेस